मुंबई,दि. २३ एप्रिल २०२०: लॉक डाऊन च्या काळात सर्व दळणवळण व उद्योग व्यवसाय बंद आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक वाहतूक देखील बंद आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बऱ्याच गोष्टीत बंद असल्याने सरकारला महसूल मिळणे बंद झाले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला उद्योग धंदे बंद असल्याने त्यातून मिळणारा कर, टोल यासारखे मिळकतीचे मार्ग देखील बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारला मिळकतीचा काहीतरी मार्ग हवा यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही उपाय सुचवले आहेत.
या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अडकलेला गाडा कसा सुरळीतपणे पुढे जाईल याबाबत काही उपाय सूचवले आहेत. प्रामुख्याने सामान्यांची गरज लक्षात घेता हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील मागणी राज यांनी या पत्रामधून केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो ट्विट केले आहेत.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व बाहेरून आलेले विद्यार्थी राहत असतात. सध्या त्यांना खाण्यापिण्याची सोय करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी या शहरांमधली हॉटेल सुरू करण्याबाबत त्यांनी सुचवले आहे. ते म्हणाले की, “आज गेले ३५ दिवस महाराष्ट्रातील उपहारगृह आणि रेस्टॉरंट पूर्णपणे ठप्प आहेत. याचा फटका जसा हॉटेल व्यवसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरामध्ये ‘हॉटेल’ ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर गरज बनली आहे. अनेक छोटी हॉटेल्स आहेत, ‘पोळी-भाजी’ केंद्र आहेत, जिथे अगदी माफक दरात ‘राईसप्लेट’ मिळते. अशा हॉटेल्स, खानावळी सुरु होणं गरजेचे आहे. याचबरोबर या हॉटेलच्या पार्सल सेवा सुरू करण्यात याव्यात जेणेकरून सोशल डिस्टन्स कायम राहील व हॉटेलमध्ये गर्दी हि होणार नाही. असेही ते म्हणाले.
याव्यतिरिक्त त्यांनी आणखी एक अनोखा उपाय सुचवला आहे. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु ठेऊन राज्याच्या महसूलाची तजवीज़ करता येऊ शकते, म्हणून कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझा उद्देश नाही असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात आवर्जून म्हटलंय.