शिरूर, दि.२६ मे २०२०: आदिवासी क्षेत्रातील अर्थचक्र सुरू करण्यासाठी जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये मनरेगा अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे तत्काळ सुरू करा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून देशभरातील अर्थचक्र थंडावले होते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने पाऊलं उचलताना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मनरेगा अंतर्गत रस्ते, गावतळी, वृक्ष लागवड अशी विविध प्रकारची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये मनरेगा अंतर्गत कामे सुरू करा अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.
आदिवासी भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनरेगा अंतर्गत अनेक कामे सुरू करता येतील. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळेल आणि गेल्या दोन महिन्यांपासून रुतून बसलेला अर्थचक्राचा गाडा सुरळीत होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळेच आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र पाठवून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्वरीत मनरेगाची कामे सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी आपण केली असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: