आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज, मंग‌ळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात होणार असून, पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल ७० टक्क्यांपर्यत घसरल्याने यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून, ८० गुण लेखी परीक्षेसाठी; तर २० गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील.

८ विभागीय मंडळांमध्ये आणि पुण्यासह राज्य मंडळाच्या ऑफिसमध्ये अशा १० हेल्पलाईन २४ तास उपलब्ध असणार आहेत. तिथे आपण परीक्षांशी संबंधित तक्रार नोंदवू शकता. मंगळवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या वेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी भाषाचे पेपर असणार आहे. तर दुपारच्या सत्रात ३ ते ६ या वेळेत जर्मन आणि फ्रेंचचा पेपर होणार आहे. परीक्षेआधी शाळांकडे देण्यात आलेलं वेळापत्रक ग्राह्य धरावं अशी सूचनाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नप्रत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणे राहणार असून, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. राज्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होईल. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेत ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा राज्यातून ११० तृतीयपंथी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ४९७९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यापैकी ८० संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा