नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३ : भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदर १० बेसिक पॉइंटने वाढविले आहेत. त्यामुळे वाहनकर्ज, गृहकर्ज आणि इतरही कर्ज महागणार आहेत. नव्या व्याजदराची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १५) होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR वाढविल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एक महिन्याच्या मुदतीसाठी MCLR ८ टक्क्यावररून ८.१० टक्के झाला आहे. तर सहा महिन्यांच्या मुदतीसाठी हाच MCLR ८.३० टक्क्यांवरून ८.४० टक्के इतका झाला आहे. ही नवी वाढ सर्व मुदतीसाठी लागू केली असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
MCLR म्हणजे ग्राहकांना कर्ज देण्यासाठीचा कमीत कमी व्याजदर होय. ही पद्धत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६ पासून सुरू केली आहे. ८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात २५ बेसिक पॉइंटने वाढ केली असल्याने विविध बँकांकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर