मुंबई, २९ सप्टेंबर २०२० : जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं त्यांची पुरस्कारासाठी एकमतान निवड केली आहे.
उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी मां , आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली.
मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. गायन आणि संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कार्य केलेल्या व्यक्तींना राज्य सरकारकडून १९९२ पासून हा पुरस्कार दिला जातो.
न्यूज अनकट प्रतिनिधी