पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पास राज्य शासनाची तत्वतः मान्यता – मंत्री दिलीप वळसे पाटील

आंबेगाव, ४ ऑगस्ट २०२० : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. यावेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व व्हिसीद्वारे उपस्थित होते.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, हा प्रकल्प २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून रेल्वे मार्ग पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग असून पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढविता येणार आहे. पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कपाता येईल. यामध्ये पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी करण्यात आली आहे. १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामार्गे प्रवासी आणि मालवाहतुक चालणार आहे. रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य दिले जाणार असून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.

विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार आहे. पुणे – नाशिक रेल्वेचा हा एकूण प्रकल्प १६,०३९ कोटी रुपयांचा असून त्यापैकी ६० % म्हणजे ९,६२९ कोटींचा वाटा विविध वित्तीय संस्था यांचा असणार आहे. २० % रेल्वेचा म्हणजे ३,२०८ कोटींचा वाटा हा रेल्वेचा असणार आहे व २० % महाराष्ट्र सरकारचा म्हणजे ३,२०८ कोटींचा वाटा असणार आहे, या बैठकीत महाराष्ट्र राज्याचा असणाऱ्या वाट्यास रुपये ३,२०८ कोटीस तत्वतः मान्यता देण्यात आली. लवकरच हा आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा