सौरऊर्जा वाढीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, २० नोव्हेंबर २०२० : राज्यात सौर ऊर्जा वाढीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. ही समिती सौर ऊर्जा निर्मितीचे सध्याचे स्रोत, संभाव्य नवे स्रोत आणि संभाव्य लक्ष्याबाबत आपल्या अहवालात शिफारशी करेल. असं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. सौरऊर्जेची स्थापित क्षमता, नवीन प्रस्तावित प्रकल्प आणि या प्रकल्पांची अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते.

डॉ. राऊत यांनी सौर ऊर्जा निर्मितीला विशेष प्राधान्य दिलं असून याचाच एक भाग म्हणून बुधवारी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यासह मेडा(महाऊर्जा) यांची एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, एम एस ई बी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, मेडाचे महासंचालक सुभाष डुंबरे आदी उपस्थित होते.

“सौर ऊर्जा वाढविण्यासाठी मेडाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी सौर ऊर्जेच्या विविध स्रोतांमधून तयार होणाऱ्या वीजेच्या वाढीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक, आर्थिक आणि नियामक इत्यादी सर्व पैलूंचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे आदेश ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा