गणेशोत्सवासाठी राज्य-सरकारकडून सूचना जारी

मुंबई २९ जून २०२१ : भाद्रपद महिन्यात येणा-या गणेशोत्सवासाठी राज्य-सरकारकडून नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नये, असे संकेत सरकारकडून देण्यात आले. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील या सणाला गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यासाठी देण्यात येणा-या सूचनांमध्ये
सार्वजनिक मंडळांनी गणेशाच्या मूर्ती चार फूटापेक्षा जास्त ठेवू नये. तसेच घरी गणपती बसवणा-यांनी या मूर्ती दोन फूटापेक्षा जास्त करु नये, जेणेकरुन या मूर्ती विसर्जित करण्यात अडथळा येणार नाही.
सार्वजनिक मंडळांनी यंदाही मिरवणूका काढू नये. ज्यामुळे गर्दी होणार नाही. कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अतिशय छोट्या प्रमाणात घरगुती कार्यक्रम करावे, जेणेकरुन कोरोनाच्या प्रसारास वाव मिळणार नाही. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी रक्तदान शिबीर, प्लाझमादान शिबीर अशा प्रकारचे कार्यक्रम करावे. जे कोरोनाच्या काळात कायम मदतशीर ठरतील, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
गणपतीच्या मूर्तींसाठी शाडू किंवा पर्यावरणपूरक सामान वापरावे, जे पाण्यात सहजरित्या विरघळू शकेल आणि निर्सगाला अडथळा होणार नाही. तसेच या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा. या तलावांची निर्मिती करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. सर्व सणांची शान असलेला गणेशोत्सव यंदाही सामान्यपणे साजरा करावा, असे आवाहन सरकारतर्फे गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा