इंदापूर, दि.१९ मे २०२०: लॉक डाऊनमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे सध्या प्रचंड प्रमाणावर हाल होत आहेत. या अडचणीत जनतेला दिलासा देण्यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी(दि.१९) रोजी इंदापूर येथे केली.
इंदापूर येथे भाजपच्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनाअंतर्गत राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले.
यावेळी हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कोरोना संकट हाताळताना सरकारमध्ये आदेश देताना सुसूत्रता दिसून येत नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यामध्ये अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. राज्यातील डॉक्टरांना पीपीई किट व इतर साहित्य वेळेवर मिळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग हा दोन महिने झाले तरी कमी न होता, उलट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याविरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे आज प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे. सद्या राज्यात स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान वेळेवर दिले जात नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
राज्यातील हजारो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना जीव गमवावा लागला आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था विदारक आहे. त्यांना काही प्रमाणात शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज आहे. राज्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना व इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा व साहित्य उपलब्ध करून देणेकडे राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शुक्रवार (दि. २२) रोजी भाजपचे राज्यातील गावोगावचे कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करतील, अशी माहिती ही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे