पुणे, २८ जुलै २०२०: पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या काळात साडेचार महिने अडीचशे कोटींपेक्षा अधिक खर्च करून सर्व यंत्रणा सक्षमपणे चालवली व त्यात कोणतीही अडचण येऊ दिली नाही, त्यामुळे आता महापालिकेला राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
कोरोना निर्मूलन आढावा बैठक सोमवारी ( दि.२७) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ही मागणी केली.
यावेळी मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत.
कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन होणार असून पुढील वीस दिवसांत पीएमआरडीएच्या माध्यमातून ते उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
त्यात राज्य शासन ५०%, पुणे
महानगरपालिका २५%, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
१२.५% आणि पीएमआरडीए
१२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे