गोल पोस्ट शैक्षणीक राज्य सरकारने शाळेची फी माफ करावी – सी आर संघटनेची मागणी

राज्य सरकारने शाळेची फी माफ करावी – सी आर संघटनेची मागणी

बारामती, ८ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नागरीकांची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत चालु वर्षाचे अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेचे संपुर्ण शुल्क माफ केले आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी सी. आर. संघटनेने उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या जागतिक कोरोना विषाणूने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यात संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे मोठ्या पगाराच्या नोकरदारापासून ते गोर-गरीब, पिडीतांच्या हातचे काम गेले आहे. रोजगार ठप्प झाले आहेत. या सगळ्यांमुळे नागरिकांना रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी झगडावे लागत आहे. सर्वसामान्य नागरीकांची जमापुंजी खर्च झाली आहे. आता शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना खाजगी शाळांनी फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला आहे.

महाराष्ट्र सरकारने नागरिकांची अडचण जाणून चालु वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ केल्यास सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळेल. अशा आशयाचे निवेदन सी. आर. संघटनेचे राज्याचे सरचिटणीस संजय वाघमारे, उपाध्यक्ष वस्ताद अस्लम शेख व राज्य संघटक अमीन शेख यांनी उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांच्याकडे दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version