पालकमंत्रीपदाचा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारचा नवा मार्ग, १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होताच सत्ताधारी शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु झाल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील काही आमदारांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली होती. या दरम्यान नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप करण्यात आले. या वाटपात काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही आदलाबदल करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. हा विस्तार लवकरच होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता सावध पावले उचलण्यात येत आहेत.

देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. पण सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न होता. या प्रश्नावर शिंदे सरकारने तोडगा काढला आहे. पालकमंत्रीपदाचा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारने नवा मार्ग काढला आहे. राज्य सरकारने १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे.

आता १५ ऑगस्टला देवेंद्र फडणवीस–नागपूर, अजित पवार–कोल्हापूर, छगन भुजबळ–अमरावती, सुधीर मुनगंटीवार–चंद्रपूर, चंद्रकांत पाटील–पुणे, दिलीप वळसे पाटील–वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील–अहमदनगर, गिरीश महाजन–नाशिक, दादा भुसे–धुळे, गुलाबराव पाटील–जळगाव, रविंद्र चव्हाण–ठाणे, हसन मुश्रीफ–सोलापूर, दीपक केसरकर–सिंधुदुर्ग, उदय सामंत–रत्नागिरी, अतुल सावे–परभणी, संदीपान भुमरे–औरंगाबाद, सुरेश खाडे–सांगली, विजयकुमार गावित–नंदुरबार, तानाजी सावंत–उस्मानाबाद, शंभूराज देसाई–सातारा, अब्दुल सत्तार–जालना, संजय राठोड–यवतमाळ, धनंजय मुंडे–बीड, धर्मराव आत्राम–गडचिरोली, मंगलप्रभात लोढा– मुंबई उपनगर, संजय बनसोडे–लातूर, अनिल पाटील–बुलढाणा तर आदिती तटकरे–पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा