राज्यस्तरीय कबड्डीपटू स्वामिनी केचेचे कर्करोगाने निधन

14

माढा, १६ ऑगस्ट २०२०: कु. स्वामिनी उध्दव केचे हिचे वयाच्या १६ व्या वर्षी कर्करोगाने अकाली निधन झाले. २०१८ ला अलिबाग येथे झालेल्या १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून स्वामिनी ने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बारामती व अलिबाग येथे झालेल्या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदके मिळवली होती.

स्वामिनीकडे खेळाबरोबर एक निर्भिड वत्कृत्व कौशल्य होते. तिने अनेक कार्यक्रमात व शालेय जीवनात आपले वक्तृत्व कौशल्य सिध्द केले होते. शालेय जीवनात कार्यक्रम म्हटले कि सुत्रसंचालन स्वामिनी करायची. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आलेगावचं नाव कबड्डी क्षेत्रात महाराष्ट्रात तिने गाजवले. तिच्या अमोघ वक्तृत्वाने तरुणाईवर विचारांचा जागर केला, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचं कौशल्य तिच्यामधे लाजवाब होतं. ती नेहमी हसतमुख असणारी, सर्वांशी आदरानं बोलणारी, मैत्रीणींवर जीवापाड प्रेम करणारी सर्वांची लाडकी ही स्वामिनी उद्धव केचे अशी तिची ओळख होती.

जिजामाता विद्यालय सराटी येथे अतिशय हुशार गुणवंत विद्यार्थिनी म्हणून गुणगौरव होता. तिची निखळ, निरागस शिस्तप्रिय जीवनशैली आदर्शवत होती. स्वामिनीची खूप मोठी स्वप्न होती. ती तेवढीच जिद्दी अन् लढावू होती. दैवाचा खेळ हा कोणालाच ठाऊक नसतो. प्रत्येक वेळी जिंकलीस तू मात्र कर्करोगाशी लढाई अपयशी ठरली. जिजामाता विद्यालय सराटी येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत होती. परीक्षा चालू असताना दहावीचे तीन पेपर दिले परंतु नंतरचे पेपर देता आले नाहीत. सध्या वय सोळा वर्ष होते. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते घरी आणल्यानंतर निधन झाले.

स्वामिनीच्या अकाली निधनाने केचे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात संपूर्ण आलेगाव खुर्द व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. आई, वडील, लहान भाऊ, आज्जी, चुलते, चुलती पश्चात असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा