राज्यातील अधिकाऱ्यांच्या दिमतीला आलिशान गाड्या, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ४६ वाहनांचे हस्तांतरण

पुणे, १३ सप्टेंबर २०२३ : बदल्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या देत, आरोग्य विभागाने त्यांची बडदास्त ठेवली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून अधिकाऱ्यांच्या दिमतीला ४६ नव्या कोऱ्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीच गाड्या सुपूर्त केल्या. राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक आणि सहायक संचालक यांच्यासाठी, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ४६ वाहनांचे हस्तांतरण केले आहे.

आरोग्य आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पर्यवेक्षकीय कामकाज सुरळीत पार पाडता यावे यासाठी वाहन खरेदीकरिता ३ कोटी ६८ लाख रुपये इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिली होती. राज्यातील ५ उपसंचालक, ११ सहायक संचालक, १४ जिल्हा आरोग्य अधिकारी व १६ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरीत करण्यात आली आहेत. यावेळी विभागीय आयुक्त वर्षा लड्डा, रामचंद्र शिंदे, उपसंचालक कैलास कराळे व अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या दोन तास उशिरा दाखल झाले. चला उरका असे म्हणत लगीनघाई सुरू केली. कंपनीकडून प्रतिनिधिक स्वरुपात गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर चालकांसोबत फोटोसेशन झाले. त्यावेळी चालकांना नव्याकोऱ्या गाड्या देत आहोत, गाड्यांची दुरुस्ती काढू नका, गाड्या कुठे धडकवू नका, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा