बारामती, २० जुलै २०२० : बारामती मध्ये आज रासप व भाजप पक्षाच्या वतीने गाईच्या दुधाला एक लिटरला सरसकट १० रुपये तर दूध पावडरला ५० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे अन्यथा १ ऑगस्ट पासून राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज प्रशासन भवन येथे तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.
यावेळी रासप व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे.खराब सोयाबीनमुळे दुबार पेरणी करावी लागली आहे.युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार तसेच अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झाले आहे. मात्र सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, त्यात सरकारने या संकटाच्या काळात दुधाचे दर कमी केल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
राज्यात १५० लाख लिटर गाईचे दूध उत्पादन होते त्यापैकी ३० लाख लिटर दुध सहकारी संस्थांकडून तर ९० लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून खरेदी केले जाते तर शासकीय योजने द्वारे फक्त एक लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या लॉकडाऊनच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सध्या खाजगी संस्थांकडून दूध २० ते २२ रुपयांपर्यंत खरेदी करत आहे. यामुळे दुधाची उत्पादन खर्च पण निघत नाही तरी शेतकऱ्याच्या दुधाला १० रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रासप व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी :
अमोल यादव.