पुढील दोन दिवस घरातच थांबा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

4

मुंबई, दि. २ जून २०२०: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला. महाराष्ट्रावर ओढवलेले नवीन संकट निसर्ग चक्रीवादळ याविषयी त्यांनी यावेळेस माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, उद्या दुपारी तीन पर्यंत हे चक्रीवादळ अलिबाग येथे धडकेल. हे वादळ अलीकडच्या काळात झालेल्या वादळांपेक्षाही जास्त भयानक असेल असे त्यांनी सांगितले. वाऱ्याचा वेग हा शंभर ते सव्वाशे किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. हे वादळ तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच संपावे अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राच्या सर्व किनारपट्टीतील भागावर तसेच या चक्रीवादळाच्या परिघामध्ये येणाऱ्या सर्व भागांना बसणार आहे. आपण तर सज्ज आहोतच पण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनादेखील सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याअंतर्गत एन डी आर एफ च्या १५ तुकड्या, एस डी आर एफ च्या ४ तुकड्या अशा एकूण १९ तुकड्या आपण जेथे आवश्यकता आहे तेथे तैनात केल्या आहेत अतिरिक्त मदत म्हणून आणखीन पाच तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत केलेले मदतीचे आश्वासन देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दूरध्वनीवरून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

३ जून पासून नवीन नियमावलीनुसार काही अटी शिथिल करण्यात आल्या होत्या तर त्या पुढे ढकलत पुढील दोन दिवस घरातच थांबा असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जी काही तयारी केली गेली आहे ते कमीत कमीत जीवितहानी आणि वित्तहानी होईल या उद्देशाने केलेली आहे. किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या चक्रीवादळा बरोबरच मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे अशा काळात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वीज प्रवाह खंडित केला जाऊ शकतो. त्यामुळे त्याची खबरदारी घेत घरातील ज्या गोष्टी बॅटरीवर चालणारे आहेत त्या चार्ज करून ठेवा. यामध्ये मोबाईल आहे, एमर्जेंसी लाईट असेल किंवा इतर गोष्टी असतील. ज्या विद्युत वस्तू आवश्यक आहेत त्यांचा विद्युत प्रवाह खंडित करून ठेवा जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास त्या वस्तूंमुळे विद्युत झटका लागणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा