महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास उठली

नवी दिल्ली,११ जुलै २०२३ : महाराष्ट्रातल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयाने दाद मागायची असल्यास नवीन याचिका दाखल करायला सांगितले आहे. दरम्यान, तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. पण राज्यपालांकडून या यादीवर कोणताही निर्णय न घेता हा विषय प्रलंबित ठेवला होता. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही १२ आमदारांच्या प्रलंबित मुद्द्यावरुन राज्यपालांवर टीका केली होती.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या १२ सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवी यादी सादर करण्याची तयारी सुरू झाली. या १२ जागांसाठी दोन्हीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॅाबिंग करत आहेत. त्याचबरोबर आता सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादीची काय भूमिका राहते हे पाहावे लागेल.

राज्यात सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल झाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारे नाही, असे म्हणत याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून समीकरणेही बदलली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा