अहमदनगरमधील शेवगावमध्ये संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीवर दगडफेक; वाहनांची तोडफोड तर २ पोलीस जखमी

अहमदनगर, १५ मे २०२३: अहमदनगरच्या शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले. त्याचबरोबर अनेक स्थानिक लोकही जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात तोडफोड करून वाहनांचे नुकसान झाले. दंगलीनंतर परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून नेवासा येथून अतिरिक्त पोलीस मागवून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ही मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली तेव्हा ही घटना घडली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरात मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. रात्री आठच्या सुमारास ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असताना अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसरीकडे, जिल्हा पोलीस राकेश ओला आणि नाशिक परिक्षेचे विशेष महानिरीक्षक बी.जी.शेखर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३१ जणांना ताब्यात घेतले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा