कोलकाता, ३ जानेवारी २०२३ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वीच उद्घाटन केलेल्या हावडा-न्यू जलपाईगुडीला वंदे भारत एक्स्प्रेसवर सोमवारी अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडाजवळील मालदा स्थानकात ही घटना घडली असून, या हल्ल्यात रेल्वेच्या दरवाज्याची काच फुटली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस मालदा कुमरगंज येथून निघताच अज्ञातांनी अचानक रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात रेल्वेचे नुकसान झाले असून, बोगी क्रमांक सी-१३ च्या दरवाज्याची काच फुटली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील हावडा येथे देशातील सातव्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केले होते. या सेमी हायस्पीड ट्रेनच्या उद्घाटनानंतर अवघ्या चार दिवसांनी दगडफेक करण्यात आली आहे.
- भाजपने केला ‘हा’ आरोप
या घटनेनंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत, टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.