पाश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत’ ट्रेनवर पुन्हा दगडफेक

कोलकता, ९ जानेवारी २०२३ :पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेकीची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील बारोसाई रेल्वे स्थानकाजवळ रविवारी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन हावडाहून न्यू जलपाईगुडीला येत होती. यावेळी वंदे भारतच्या C14 कंपार्टमेंटवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे ट्रेनला बराच वेळ बोलपूर स्थानकात थांबवावे लागले. मात्र, एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. दगडफेकीची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या हल्ल्यानंतर एकाच आठवड्यात वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. या अगोदर २ जानेवारीला मालदाजवळ वंदे भारत ट्रेनवर आणि ३ जानेवारीला फणसीदेवाजवळ दगडफेक करण्यात आली होती. ३ जानेवारी रोजी झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा