“बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करेल”, पूजाचे वडिल लहू चव्हाण

बीड, १५ फेब्रुवरी २०२१: बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नंतर राज्यात राजकीय वातावरण तापत असताना दिसत आहे. मात्र आपल्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे असे मत तिच्या वडिलांनी व्यक्त केले आहे. पूजाच्या आत्महत्येवरून विनाकारण आमची बदनामी केली जात आहे. आमची ही बदनामी त्वरीत थांबवा. आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

तिच्या वडिलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “या प्रकरणात आमची बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहेत. आता पूर्ण कपडे काढू नका. कृपा करा, आता आणखी बदनामी करू नका, अशी हातजोडून विनंती करतानाच तुम्ही आणखी बदनामी केली तर मी आत्महत्या करेन.”

माझ्या मुलीची बदनामी होत आहे

पुढे चव्हाण यांनी सांगितले की, “माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बदनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असंही विचारलं जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही. ”

चक्कर येत असल्याचा दावा

पुढे त्यांनी सांगितले की, “मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचे ती सांगत होती, असे तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्राने सांगितले. सांगा आता मी कुणावर आरोप करू? असा सवाल त्यांनी केला.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा