नाशिक, दि.१६ मे २०२०: टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत सत्यता लपवून खोटी अफवा पसरवल्या जात असल्याचं मत किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.
वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना आजपर्यंत समोर आलेली नाही. तसेच टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे.
तसेच अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभा करत आहे.
टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन दिवसात याबाबत निदान होईल अशी अपेक्षा आहे. कृषी विभागाने या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून आजारावरील उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तातडीने उपलब्ध करून दयावे असे आवाहन किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: