कोंबड्यावरून वाद दोन गटात तुफान हाणामारी

34

राजगुरूनगर, दि.१४ जून २०२० : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील औंढे आंबोली गावात “आमच्या कोंबड्या तुमच्या कोंबड्यांमध्ये आल्यात त्या परत द्या”असे म्हटल्यामुळे दोन कुटुंबामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चाकू,दगड व काठीने हाणामारी झाली. मारामारी प्रकरणी दोन्ही गटांवर परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत तर ७ जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी आज दि.१४ जून रोजी दिली आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेक जण घरात बसून आहेत. गावाकडे मुंबई व पुणे शहरातून ही अनेक जण आले आहेत त्यामुळे गावागावांत अनेक कुटुंबात ,भावकित किरकोळ कारणांवरुन भांडणतंट्याच्या घटना वाढत आहेत याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची संख्या वाढत आहे.

खेड तालुक्यातील औंढे आंबोली गावातील हाणामारी झालेली दोन्ही शिंदे कुटुंब शेजारी राहतात. शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबाने पाळलेल्या कोंबड्या एकमेकांमध्ये मिसळलेल्या होत्या. त्यावेळी आमच्या कोंबड्या तुमच्या कोंबड्यांमध्ये आल्यात त्या परत द्या” असे म्हटल्यामुळे दोन्ही कुटूंबात वाद होऊन चाकू दगड,काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन्ही शिंदे कुटुंबावर हाणामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सात जणांना अटक झाली असून पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवंत गिजरे आणि विक्रम तापकीर अधिक तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुनील थिगळे