नाशिक, १ फेब्रुवरी २०२३ : हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी पी-वेडिंग शूटिंग केले. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले जात असताना त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसीलदार, प्रांत; तसेच विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आहेत. याच विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक असलेले युवक नोंदणीसाठी येतात. असेच एक जोडपे विवाह नोंदणीसाठी आले; मात्र परिसरातील हेरिटेज वास्तू पाहून हे जोडपे त्याच्या प्रेमात पडले. मोह अनावर झालेल्या या दांपत्याने तेथेच फोटो शूटिंग सुरू केले.
कार्यालयाच्या परिसरात विनापरवागनी प्री-वेडिंग शूटिंग केले जात असताना तेथे उपस्थित सुरक्षारक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी सदर जोडप्याला न हटकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्यापर्यत पोचल्यानंतर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत; तसेच संबंधित जोडप्याला समज देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर