भारतात जसा ‘चिकन नेक’ प्रदेश आहे, तसाच तो बांगला देशात ही आहे. चीनच्या दौऱ्यात बांगला देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख डॉ. मोहंमद युनूस यांनी चीनला गुंतवणुकीसाठी दिलेल्या ऑफरमध्ये मात्र भारताविरुद्ध मोठा कट असण्याची शक्यता दडलेली दिसते. युनूस यांनी पुन्हा एकदा आपल्या भारतविरोधी योजना मांडल्या आहेत. त्यांनी चीनला बांगला देशातील ‘चिकन नेक’ जवळ गुंतवणूक करण्यासाठी केवळ निमंत्रणच दिले नाही, तर भारतातील सात ईशान्येकडील राज्ये ‘लँडलॉक्ड’ आहेत आणि या संपूर्ण प्रदेशासाठी बांगला देश हा समुद्राचा एकमेव संरक्षक आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तान, चीन, म्यानमार आणि बांगला देश हे चार देश ‘चिकन नेक’जवळ एकत्रित कुरघोडी करणार असतील, तर भारताला सावध राहावे लागेल.
Bangladesh role in Northeast India security: बांगला देशाच्या हंगामी सरकारचे अध्यक्ष डॉ. मोहंमद युनूस यांचे वागणे भारतद्वेषी आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. हसीना सरकारचे ज्या ज्या देशांशी चांगले संबंध होते, त्या त्या देशांना शत्रू समजून त्यांच्याविरोधातील देशांना एकत्र करण्याची मोहीम उघडल्यासारखेच आहे. चीनच्या ताज्या दौऱ्यात त्यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. कारण ईशान्य भारतात सिलीगुडी कॉरिडॉर आहे, ज्याला भारताचा ‘चिकन नेक’ मानला जाते. हा ६० किलोमीटर लांब आणि २२ किलोमीटर रुंद कॉरिडॉर ईशान्येतील सात राज्यांना भारताशी जोडतो. युनूस यांनी चीनला बांगला देशात आपला आर्थिक प्रभाव वाढवण्यास सांगितले आणि भारताच्या भूपरिवेष्टित उत्तर-पूर्वेकडील राज्ये या संदर्भात एक संधी असल्याचे नमूद केले.
नुकत्याच झालेल्या चार दिवसांच्या चीन दौऱ्यात युनूस यांनी ही टिप्पणी केली होती. युनूस म्हणाले, की भारताच्या पूर्व भागातील सात राज्यांना ‘सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया’ म्हणतात. ते सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले क्षेत्र आहेत. त्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही. त्यांच्या या विधानाचा अर्थ त्यांची नजर आता भारताच्या ‘चिकन नेक’वर आहे. बांगला देश या भागाचा रक्षक आहे. या क्षेत्रासाठी मोठी क्षमता आहे आणि चीन येथे अर्थव्यवस्था वाढवू शकतो. युनूस यांचे हे विधान केवळ सामान्य टिप्पणी नाही, तर भारतासाठी हा एक मोठा इशारा आहे. बांगला देशला एक प्रादेशिक शक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचे आहे, तर चीन भारताच्या ईशान्य भागात आपली शक्ती वाढवू पाहत आहे.
दुसरीकडे पाकिस्ताननेही युनूस यांच्यांशी जवळीक दाखवली आहे. म्यानमारमध्ये सध्या लष्कर विरोधात अंतर्गत शक्ती लढत आहेत आणि तो सध्या भूकंपाने हादरला असला, तरी तो ही मणिपूरसह अन्य राज्यात आगळीक करीत असतो. बांगला देश स्वतःला या क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे ‘ट्रान्झिट हब’ म्हणून स्थान देत आहे. चीनचे नाव जोडून युनूस सूचित करत आहेत, की जर भारत ईशान्येचा विकास करण्यात बेफिकीर दिसला, तर चीन या भागात आपली पकड मजबूत करू शकतो. यामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांसाठी अडचणी निर्माण होणार आहेत.
भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा या राज्यांना ‘सात बहिणी’ म्हणतात. हा भाग बांगला देशाला जोडलेला आहे. चीन अनेक वर्षांपासून या भागावर लक्ष ठेवून आहे. इथला ‘चिकन नेक’ त्याला आव्हान देतो. ‘चिकन नेक’मध्ये शिरकाव करता आला, तर एक प्रकारे भारताची मान कापली जाईल. काही दिवसांपूर्वी तिथे बांगला देशी दहशतवादी पकडले गेले होते. त्यांचा उद्देश ‘चिकन नेक’ कापण्याचा होता.
ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा फक्त एक अरुंद जमीन मार्ग आहे, ज्याला ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ किंवा ‘चिकन नेक’ म्हणतात. त्याची रुंदी केवळ २२-२५ किलोमीटर आहे, जी सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. तो कट करणे म्हणजे भारताचा अनेक राज्यांशी संपर्क तुटणे. भारताचा ‘चिकन नेक’ म्हणून ओळखला जाणारा ‘सिलीगुडी’ कॉरिडॉर अनेकदा चर्चेत असतो. हा तोच कॉरिडॉर आहे, जो उर्वरित भारताला ईशान्येशी जोडतो. चीनची या कॉरिडॉरवर अनेक दशकांपासून वाईट नजर आहे. या कारणास्तव, जून २०१७ मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम लष्करी संघर्ष सुरू झाला. चीन या कॉरिडॉरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, जिथून तो भारताचा हा अरुंद कॉरिडॉर ताब्यात घेऊ शकतो; पण फार कमी लोकांना माहिती आहे, की भारताप्रमाणेच बांगला देशातही ‘चिकन नेक’ आहे, जो सिलीगुडी कॉरिडॉरसारखा अरुंद आहे.
हे मुख्य भूमी बांगला देशापासून चितगाव हे सर्वात मोठे बंदर शहर वेगळे करते. बांगला देशची ही अरुंद पट्टी बंद करून, त्याची २० टक्के जमीन उर्वरित देशापासून वेगळी केली जाऊ शकते. जर हा कॉरिडॉर कधीही बंद झाला, तर त्याचे सर्वात मोठे बंदर आणि चितगाव शहर वेगळे होऊ शकते; मात्र या कॉरिडॉरचे महत्त्व भारताच्या ‘सिलीगुडी कॉरिडॉर’इतके गंभीर नाही. चितगावचा हा भाग घनदाट जंगले आणि पाण्याच्या प्रवाहांनी भरलेला आहे. त्याच्या लँडमास आणि इन्सुलर निसर्गामुळे, ते भारत, बांगला देश आणि म्यानमारमधील बंडखोरांना सुरक्षित आश्रयस्थान असते.
बांगला देश हा सात समुद्रांचा रक्षक आहे, असे युनूस यांचे विधान बांगला देशाची सामरिक स्थिती दर्शवते. भारताच्या ईशान्येकडील राज्यांची मुख्य कनेक्टिव्हिटी बांगला देशच्या माध्यमातूनच सुलभ होऊ शकते. बांगला देशला हे संकेत द्यायचे आहेत, की ते या प्रदेशातील भौगोलिक अडचणी सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. चीनला बांगला देशमध्ये गुंतवणुकीसाठी निमंत्रण देणे म्हणजे भारताला इशारा देण्यासारखे आहे, कारण चीन आधीच ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) अंतर्गत बांगला देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. चीनने बांगला देशामार्गे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवेश मिळवला, तर तो भारतासाठी मोठा सुरक्षेचा धोका बनू शकतो.
चीन दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असताना युनूस यांचे हे वक्तव्य आले आहे. बांगला देश आणि भारत यांच्यात अलीकडे काही व्यापार आणि जल करारांवरून तणाव निर्माण झाला असून, युनूस यांचे वक्तव्य हे भारतावर दबाव टाकण्याची रणनीती असू शकते. बांगला देशाला चीनकडून मोठी गुंतवणूक आणि आर्थिक मदत मिळवायची आहे आणि हे विधान चीनला आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो. पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगला देशामधील संबंध मजबूत झाले होते; परंतु आता राजकीय परिस्थिती बदलल्याने भारतासाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. ‘चिकन नेक’ हा भारतासाठी नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिला आहे. नेपाळ हे ‘चिकन्स नेक’ च्या पश्चिमेला, उत्तरेला भूतान आणि दक्षिणेला बांगला देश वसलेले आहे आणि त्यामुळे हे तिन्ही देश भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
बांगला देश ‘चिकन नेक’बाबत भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद युनूस यांच्या या विधानामुळे शेख हसीना यांचे सरकार पडण्यामागे कोणते कारस्थान असू शकते हे स्पष्ट होते. असे असले, तरी आणि हे दोन्ही देश भारताचा वीक पॉईंट मानत असलेला ‘चिकन नेक’ हा भारताचा सर्वात मजबूत सुरक्षा कॉरिडॉर आहे, त्यामुळे त्या मार्गाने आजपर्यंत कोणत्याही शत्रूचे षड्यंत्र यशस्वी झालेले नाही. ‘सिलीगुडी कॉरिडॉर’बाबत लष्करप्रमुखांचे नुकतेच विधान चीन आणि मोहम्मद युनूस यांच्या प्रत्येक हालचालीचा पर्दाफाश करण्यासाठी पुरेसे आहे. हा भारताचा सर्वात कमकुवत नसून सर्वात मजबूत दुवा आहे, असे सांगून लष्करप्रमुखांनी ‘चिकन नेक’ हे आमचे सर्वात मजबूत क्षेत्र आहे कारण पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडे तैनात केलेले आमचे संपूर्ण सैन्य तेथे एकत्रित करता येऊ शकते, असे म्हटले आहे. ड्रॅगनची प्रत्येक हालचाल आणि बांगला देशचा बदलता सूर समजून घेऊन भारत केवळ या धोक्यांपासून सावध नाही, तर आपली सामरिक स्थिती सतत मजबूत करत आहे.
भारतीय लष्कराने या भागात सुरक्षा उपाय वाढवून अनेक तयारी केली आहे. सिलीगुडी कॉरिडॉरची सुरक्षा भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सवर अवलंबून आहे. त्याचे मुख्यालय सिलीगुडीजवळ सुकना येथे आहे. हा कॉरिडॉर म्हणजे २२ किलोमीटर रुंद जमिनीचा एक अरुंद भाग आहे, जो ईशान्य भारताला देशाच्या इतर भागाशी जोडतो. हे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला बांगला देश आणि लगतच्या भागात चीन आणि भूतान यांच्या सीमा आहेत. या प्रदेशाची सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण येथे कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा भारतातील ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारतापासून तोडून टाकू शकते. बांगला देश आणि चीन अशाच तसे स्वप्न पाहत आहेत; परंतु भारत ते त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.
प्रतिनिधी,भागा वरखाडे