बारामती, दि. १६ जुलै २०२०: बारामती शहरात लॉकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यास वार व वेळ ठरवून दिली होती. मात्र मागील काही दिवसात शहराच्या मध्यवर्ती परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी दिनांक १५ च्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन जाहीर केला असल्याने कडक बंदोबस्त ठेवला असून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
बारामती शहरात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण नव्हते. मात्र शासनाने व्यवसायास परवानगी दिल्यावर बारामती तालुक्यासह इंदापुर, फलटण, दौंड या तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येत असल्याने बाजारपेठेत गर्दी होताना दिसते आहे. तर दुकानदार किंवा ग्राहक यांच्याकडून कोणतीही खबरदारी किंवा सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
यावर उपाय म्हणून आज गुरुवार पासुन बारामती शहरात अनिश्चित कालावधीसाठी बारामती नगर पालिका हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने काल मध्यरात्री पासून शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असुन शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून विचारपूस होत आहे. नागरिकांनी अति अत्यावश्यक कामासाठीच घरातून बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव