राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ लातूर कडकडीत बंद

‘कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा’ राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना निवेदन

लातूर, २५ नोव्हेंबर २०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमींनी शुक्रवारी (ता.२५) पुकारलेल्या लातूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद कालावधीत शाळा- महाविद्यालये, दुकाने, प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून बंदला दुचाकी फेरीने सुरवात झाली. यावेळी शिवप्रेमींनी नागरिक व व्यापाऱ्यांना बंदमागची पार्श्वभूमी सांगत बंदला प्रतिसाद देण्याची व सामील होण्याची विनंती केली छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक विवेकानंद चौक, गूळमार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक व तहसील कार्यालय असा फेरीचा मार्ग होता. काहीच्या हाती भगवे झेंडे, तर काहींच्या हाती कोश्यारी यांच्या निषेधाचे फलक होते. जिजाऊ, शिवरायांचा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत फेरीने शहरातील मुख्य मार्ग व चौक पिंजून काढले. ‘कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा’ अशी मागणी त्यांनी केली. दुपारी एक वाजता फेरीचा तहसील कार्यालयासमोर समारोप झाला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करीत राज्यपाल कोश्यारींना तत्काळ राज्यपाल पदावरून हटविण्याची जोरदार मागणी केली व त्यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

दुपारी एक वाजता राष्ट्रपती‌‌ व मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा विचार हा सदासर्वदा विश्वव्यापी व विश्ववंद्य आहे. जगाने त्यांच्या कार्याची व शौर्याची थोरवी गायिली आहे. तथापि, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवराय व अन्य महापुरुषांबाबत सातत्याने अवमानकारक विधाने करीत आहेत. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या अशा वर्तनाने राज्यपालपदाचीही प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपतींना करण्यात आली. मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषदेत कोश्यारी यांच्याविरुद्ध निंदाजनक ठराव मांडून व तो मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवावा व राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अन्यथा शिवप्रेमी कोणत्याही मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा