पुणे, २३ जानेवारी २०२३ : औरंगाबाद महापालिकेने ‘जी-२० परिषदे’ची जोरदार सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते ‘एसटीपी’च्या पाण्याने धुऊन चकाचक केले जात आहेत. त्यासाठी प्रभाग कार्यालयनिहाय चार कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभाग कक्षप्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी दिली.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘जी-२० परिषदे’चे प्रतिनिधी शहरात येणार आहेत. या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. महापालिकेकडून शहरात सुशोभीकरणाची कामे केले जात आहेत. रस्ते, दुभाजक, उड्डाणपुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. धूळमुक्त रस्ते तयार केले जाणार आहेत. पुणे शहरात ज्या पद्धतीने कामे करण्यात आली, त्या पद्धतीने औरंगाबाद शहरातही स्वच्छतेची कामे सुरू आहेत. रस्त्यांवर कुठेही धूळ राहू नये याकरिता रस्ते धुऊन चकाचक करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी रस्ते धुऊन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रभाग कार्यालयातील वॉर्ड अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. रोज रात्री उशिरा ‘एसटीपी’चे पाणी टँकरने आणून रस्ते धुऊन स्वच्छ केले जात आहेत. विमानतळ ते केंब्रिज शाळा, सिडको बसस्थानक, गरवारे चौक, आंबेडकर चौक, हर्सूल टी पॉइंट, हिमायतबाग, अण्णाभाऊ साठे चौक, जामा मशीद, मिलकॉर्नर, बाबा पेट्रोलपंप, लिट्ल फ्लावर, बीबी-का-मकबरा, बाबा पेट्रोलपंप ते क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हनहिल, सिडको बसस्थानक आदी रस्ते ‘एसटीपी’च्या पाण्याने धुऊन चकाचक करण्यात येत असल्याचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात साफसफाईची टाळाटाळ करणारे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मन लावून साफसफाई करतात, हे पाहून नागरिकांना प्रश्न विचारल्याशिवाय रहावले नाही. सफाई कामगारांना या प्रश्नाचे उत्तर विचारल्यानंतर ‘जी-२० परिषदे’चे प्रतिनिधी शहरात येणार आहेत. या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी ही विशेष स्वच्छता सुरू असल्याचे समजले. ‘जी-२० परिषदे’च्या प्रतिनिधींमुळे तरी औरंगाबाद शहरातील रस्ते चकाचक झाले, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील