विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ‘सानुग्रह’ योजना अपघात झाल्यास शासनाचा मदतीचा हात!

Govt Aid for Students in Accidents,Sanugrah Yojana
विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी 'सानुग्रह' योजना;

Govt Aid for Students in Accidents,Sanugrah Yojana: शाळा सुटल्यावर घरी परतताना, सहलीवर असताना किंवा अगदी शाळेच्या इमारतीतही घडणाऱ्या दुर्दैवी अपघातांमध्ये निष्पाप विद्यार्थी गंभीर जखमी होतात किंवा आपला जीव गमावतात. अशा हृदयद्रावक घटना पालकांचे आयुष्यच उद्ध्वस्त करतात. मात्र, या कठीण प्रसंगी शासन ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गेल्या वर्षभरात (२०२४-२५) ४७९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

योजनेतून मिळणारी आर्थिक मदत:

ही योजना अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार देते,

  • विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
  • अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • किरकोळ दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते.

शाळा आणि पालकांमध्ये माहितीचा अभाव;
एवढी महत्त्वाची योजना असूनही, अनेकदा अपघात घडल्यानंतर शाळा किंवा पालकांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि वेळेचे भान नसल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहतात किंवा मंजूरच होत नाहीत, ज्यामुळे गरजू कुटुंबांना वेळेवर मदत मिळत नाही.

योजनेच्या प्रमुख अटी:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत,

  • विद्यार्थी शासकीय किंवा अनुदानित शाळेतील असावा.
  • अपघात शिक्षणाशी संबंधित वेळेतच घडलेला असावा (उदा. शाळेत येताना-जाताना, शाळेच्या आवारात, सहलीवर).
  • अपघातानंतर ६० दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, डॉक्टरचा अहवाल, एफआयआर (FIR) आणि पालकांचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अशी आहे अर्ज प्रक्रिया:

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे,

  • मुख्याध्यापक अपघाताची शिफारस करतील.
  • संबंधित कागदपत्रांसह जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज जातील.
  • शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर
    विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो.
    ही योजना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी घेणारी आहे. शाळा आणि पालकांनी या योजनेची माहिती घेऊन, गरजू कुटुंबांना योग्य वेळी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे