ऑस्ट्रेलियात पुन्हा विद्यार्थ्यावर हल्ला; संशयित आरोपी अटकेत

14

आग्रा, १४ ऑक्टोबर २०२२: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका २७ वर्षीय संशयिताला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गर्ग असे या तरुणाचे नाव असून सिडनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समध्ये शुभम मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत होता. आयआयटी मद्रासमधून बीटेक आणि एमएससीचं शिक्षण पूर्ण करून एक सप्टेंबर रोजी पुढील शिक्षण घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच शुभम सिडनीमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच सहा ऑक्टोबर रोजी त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला.

हल्लेखोराने शुभमवर केले चाकूचे ११ वार

शुभम गर्गवर हल्लेखोराने चाकूचे ११ वार केले असल्याची माहिती शुभमचा रूम पार्टनर भुवन तिलानीने दिली. या हल्ल्यात त्याचा चेहरा, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या असून, शुभमवर सध्या सिडनीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुभमचे कुटुंबीय आग्रामध्ये राहतात. हा हल्ला वर्णद्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.