मुंबई, २ नोव्हेंबर २०२०: विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे. फी वाढीविरोधात आणि अकरावीच्या प्रवेशबाबत मुद्दे घेऊन विद्यार्थी-पालक समन्वय समितीने राज ठाकरेंची भेट घेतली. अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. कारण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अॅडमिशन झाली आहेत, त्याचं काय होणार हा सुद्धा मुद्दा आहे.
यामध्ये काही पालकांचा फी वाढीचा देखील मुद्दा होता. काही शाळांनी राज्य सरकारच्या जीआरनंतरही फी वाढ केली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या भेटीमध्ये कोचिंग क्लासेसचे मालकही उपस्थित होते. कोंचिग क्लालेस सुरू करावेत, अशी त्यांची मागणी होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
मागील काही महिन्यांपासून अनेकजण राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आहेत. मागच्या आठवड्यात वीज प्रश्नावरुन राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली होती. यावेळी “आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे