एसटीने रस्ता बदलल्याने नागरिकांचे हाल, विद्यार्थ्यांनी रोखली एसटी

कडूस, ७ जुलै २०२३: राजगुरुनगर-साबुर्डी एस.टी बस कडूस स्टँडला न येता परस्पर खेड व साबुर्डीला जात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखून पूर्ववत कडूसवरुन सोडण्याची मागणी केली. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र तीच योजना नीट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही. तर त्या योजनेचे सार्थक होत नाही.

खेड बाजारपेठेलाही अबालवृद्ध प्रवाशांसह शेतकरीही मोठ्या संख्येने जात असतात. सर्वांना एसटीच सोयीची ठरते. मात्र एस टी ही स्टँडला न येता परस्पर गावावरील बाजूस असणाऱ्या चौकातून थेट जात असल्याने, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखली. बस स्टँडवर येत नसल्याने ग्रामस्थांचीही गैरसोय होत आहे. तसेच एसटी महामंडळाचेही हजारों रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

परिणामी संतप्त विद्यार्थ्यांनी जोपर्यंत बस ही कडूस स्टँडला येणार नाही, तोपर्यंत बस समोरुन कोणी हालणार नाही असा पवित्रा घेत बस रोखली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. यावेळी विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा