पुणे, 5 ऑक्टोंबर 2021: अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अखेर काल सुरू झाल्या. कालपासून राज्यातल्या शाळा सुरू होत असतानाच पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आलाय. हा प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातल्या ज्ञानगंगा शाळेतील आहे. यामुळं पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शाळांकडून फी वसुलीसाठी मनमानी सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांना मात्र शाळेच्या या पावित्र्याने धक्का बसला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या पालकांनी शाळेच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पालकांच्या एकजुटीनंतर शाळा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला.
कोरोना सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा गेल्या दीड ते दोन वर्ष बंद आहे. या पूर्ण काळात शाळा बंद असल्याने शाळांना कोणतेही उत्पन्न मिळालं नाही. तर दुसरीकडं लॉक डाऊन असल्यामुळं पालकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्यामुळं अनेक पालकांनी आधीच्या थकित भरलेल्या नाहीत. यापूर्वीही शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर राज्य सरकारनेही शाळांना याबाबत चेतावणी दिली होती. मात्र यंदाही तोच प्रकार पुन्हा होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे