पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम बंद करावा यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटला ठोकले कुलूप

नागपूर, १ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने ३ वर्षांचा नवीन पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याच्या विरोधात, गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळेच आता विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी विद्यापीठाच्या गेटला टाळे ठोकले. यासह गेटसमोरच घोषणाबाजी करत राहिले. राज्यातील अनेक खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये केवळ कागदावरच सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या स्थितीत नवीन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देणे योग्य नाही. बारावीनंतर ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स सुरू आहे. आता पुन्हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे एमबीबीएस, बीएएमएसमध्ये फक्त पदवी असते, त्याचप्रमाणे व्हेटर्नरीमध्येही पदवी असावी. डिप्लोमा कोर्स सुरू करण्याची गरज नाही.

हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास पदवीधारकांवर अन्याय होणार आहे. ४ महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्यावतीने निषेध व्यक्त करणारे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले, मात्र अद्यापही या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. महाराष्ट्र व्हेटर्नरी स्टुडंट्स असोसिएशनच्या बॅनरखाली सुरू असलेल्या या आंदोलनात राज्यभरातील ६ महाविद्यालयातील १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा