अभाविप मार्फत पुण्यातही करण्यात आले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पुणे, १५ फेब्रुवरी २०२१: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात ताळेबंदी लावण्यात आली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मंदिर म्हणजेच विद्यापीठ व महाविद्यालय देखील बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्याची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली, आणि गेल्या ११ महिन्यापासून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘ऑनलाईन’ हा जरी पर्याय असला तरी देखील त्यावर प्रभावीपणे विद्यार्थ्यांना निर्भर राहत येत नाही असे समजून आले आहे. तसेच देशात सर्व पूर्ववत झाले आहे, सर्व बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था, चित्रपट गृहे, हॉटेल सुरू झालेत आणि आता कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मागील ११ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील बंद असलेली विद्यापीठे, महाविद्यालये ही १५ फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहेत.

महाविद्यालय सुरू झाल्यामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थ्यांच्या आगमनाची सुरुवात ही झाली आहे. वर्षभराच्या ‘ब्रेक’ नंतर पुन्हा महाविद्यालयात येत असताना विद्यार्थी उत्सुक आणि आनंदी होते.

गेल्या ११ महिन्यानंतर महाविद्यालयात विद्यार्थी शिकायला आले आहेत म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत करण्यासाठी “नमस्ते स्टुडंट्स – चलो कॉलेज अगेन” अभियान पुणे शहरातील विविध महाविद्यालयात साजरे करण्यात आले, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आले, या अभियानाच्या माध्यमातून अभाविप कार्यकर्ते सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संवाद साधला, या वेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

“११ महिन्यानंतर महाविद्यालय सुरू झाले आहेत म्हणून संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अभाविपने ‘नमस्ते स्टुडंट्स’ या अभियानातून पुणे शहरातील महाविद्यालयात ढोल-ताशे वाजवून व मिठाई, पुस्तक वाटून, विद्यार्थ्यांचे स्वागत केले, तसेच वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू करावीत या साठी ही अभाविप मागणी करत आहे” अशी माहिती अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी व्यक्त केले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा