शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर थंडीत बसविले; जळगावातील धक्कादायक प्रकार, पालक संतप्त

10

पुणे, १५ जानेवारी २०२३ : जळगाव शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील काही विद्यार्थ्यांनी शाळेची फी न भरल्याने त्यांना शाळेने वेठीस धरले आहे. शनिवारी (ता.१४) सकाळी आठ ते दहा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच बसवून ठेवण्याचा धकादायक प्रकार शाळा प्रशासनाकडून करण्यात आला. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवल्याची घटना समोर आल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

जळगाव शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दिवसागणिक वाढ होत आहे. या इंग्रजी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊन चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्याची पालकांची धडपड सुरू आहे; मात्र वाढती महागाई आणि अवाजवी फी वाढीच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांची वेळेवर फी भरली जात नसल्याने पालकांना चिंता सतावत आहे. जळगाव शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपक प्रकाश मांडोळे, जितेंद्र बाबूलाल राठोड यांच्यासह इतर पालकांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत; मात्र शाळेची फी वेळच्या वेळी न भरल्याचे कारण पुढे करीत शनिवारी चक्क आठ- ते दहा विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणावर बसवून ठेवल्याची घटना आज उघडकीस आली आहे. यासंदर्भात काही पालकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

पालकांचे म्हणणे आहे, की शाळेमधून फोन आला व सांगण्यात आले, की तुम्ही तुमच्या मुलांची फी भरलेली नसल्यामुळे त्यांना तुम्ही घरी घेऊन जा. आम्ही मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत गेले असता, आठ ते दहा मुलांना शाळेच्या पटांगणात कडाक्याच्या थंडीमध्ये बसविण्यात आले होते.

आम्ही सर्व पालक मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी जात असताना आम्हाला मुख्याध्यापकांना भेटण्यास जाऊ दिले नाही. उलट शिपायामार्फत निरोप पाठवून मला पालकांना भेटायचे नाही, असा निरोप दिल्याचा प्रकार घडला. कोरोनामुळे आमची परिस्थिती हलाखीची झाली असून, शासनाने लागू केलेल्या १५ टक्के फी सवलतीचा ‘जीआर’ही मान्य केलेला नाही. आमच्या परिस्थितीनुसार आम्ही फी भरण्यास तयार आहोत, असेही पालकांनी निवेदनात म्हटले आहे.

वर्गातील इतर मुलांमधून उठवून कडाक्याच्या थंडीत बाहेर बसवून मुलांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार धक्कादायक आहे. त्यांची फी तर त्यांना आज ना उद्या मिळणारच आहे; परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? त्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त पालकांनी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा