“त्या” रेल्वे अपघातप्रकरणी अहवाल सादर

जालना, दि.५ जून २०२०: येथून औरंगाबादकडे रेल्वे रुळावरून पायी जाणाऱ्या मध्यप्रदेशातील १६ मजुरांना एका मालवाहू रेल्वेने दि.८ मे रोजी पहाटे पाच वाजता झोपेतच चिरडले होते. याघटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या रेल्वे अपघात प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अखेर २७ दिवसानंतर ही चौकशी पूर्ण झाली असून गुरुवारी ( दि. ४) चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जालना येथील दोन स्टील कंपन्यांत काम करणाऱ्या २० कामगारांनी दि.७ मे रोजी रात्री जालना येथून औरंगाबादकडे रेल्वे रुळावरून पायी प्रवास सुरू केला होता. करमाड जवळ पोहोचल्यानंतर चालून चालून थकवा आल्याने हे कामगार रुळावरच झोपी गेले. शुक्रवारी ( दि. ८) पहाटे पाच वाजता एका मालवाहू रेल्वेने यातील सतरा कामगारांना चिरडले . या भीषण अपघातात १६ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला तर तीनजण या अपघातातून बचावले .

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश हळहळला. दरम्यान,परप्रांतीय कामगारांना शासनाने स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केलेली असताना हे वीस कामगार रात्रीच्या वेळी पायी का निघाले, लॉक डाऊन सुरू असताना सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देखील पोलिसांना हे पायी जाणारे कामगार दिसले का नाही, इतर जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर चेक पोस्ट होत्या. मात्र, रेल्वे रुळावर पोलिस बंदोबस्त नव्हता का, संबंधित स्टील कंपनी व्यवस्थापनाला देखील या कामगारांची देखरेख ठेवता आली नाही का अशा अनेक प्रश्नांनी हे अपघात प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

जिल्हा प्रशासनाने या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. नेटके यांनी २७ दिवसात ही चौकशी पूर्ण करून गुरुवारी ( दि. ४) चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा