हडपसर, दि. २३ ऑगस्ट २०२०: मुठा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोघांना पोलिसांनी व नागरिकांच्या मदतीने वाचविले गेले आहे. शिवणे भागात ही घटना घडली असून निताई मुकुल मिस्त्री वय ३० आणि जोय कालीपोती सरदार वय २० दोघे रा. हरे कृष्ण मंदिर, उत्तम नगर अशी दोघांची नावे आहेत.
खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवणे स्मशानभूमीजवळ दोघेजण नदीत आंघोळीसाठी उतरले. पाण्याच्या प्रवाहात दोघेजण वाहून गेल्याची माहिती उत्तम नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांना मिळाली. त्यानंतर तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने त्यांनी दोघांना पाण्याबाहेर काढले. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी विश्वास गिरे, रितेश शिंदे, सनी दगडे, श्याम ससाने, स्थानिक नागरिक हेसुद्धा बचाव कार्यात सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे