युती धर्म पाळुन काम कराल तरच यश, श्रीकांत शिंदे यांच्या सेना-भाजप नेत्यांना कानपिचक्या

कल्याण १७ जून २०२३: मागील काही दिवसांपूर्वी पासून शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीमध्ये मध्ये वितुष्ट आल्याचे दिसतंय. त्यातच शिवसेनेच्या शिंदे गटाने मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियेतेविषयी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन वाद ओढवून घेतला. यावरून राजकीय वर्तुळात चांगलेच घमासान झाले आणि त्यातच भाजपने कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर आपला अधिकार सांगितला. भाजपकडून कुरघोडी होत असल्याने शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली.अशातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना बेडकाची उपमा देऊन टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटही आक्रमक झाला आणि त्यांनीही बोंडे यांची लायकी काढली.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपली युती नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चांगले होईल, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी दोन्हीकडच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. तसेच अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनर लावल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

या मेळाव्यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आधीचे सरकार घरात होते, तर आताचे सरकार आपल्या दारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे, अशी टीका करत राम मंदिर बांधणाऱ्यांसोबत गेलो तर बिघडलं कुठे?असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. काँग्रेससोबत जाण्याआधी मी माझं दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांनीच सांगितले होते ना? त्यामुळेच त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले असेही शिंदे म्हणाले.

कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून सावरकरांचा धडा वगळला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय असुन आता जे लोक काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांनी सांगावे त्यांना हे मान्य आहे काय? असा सवालही श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यांच्या डोक्यात खोके प्रचंड घुसले आहेत. कारण आधी खोके यायचे, आता ते बंद झाले. कोरोना काळात सामान्य शिवसैनिक रस्त्यावर उतरला, घराबाहेर पडला तर यांनी फक्त ऑनलाईन मार्गदर्शन केले. तरीही ते टॉप ५ मध्ये कसे? असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा