औरंगाबाद, ३ जानेवारी २०२२ : योगी डिव्हाइन सोसायटी पवई, मुंबई व श्री स्वामीनारायण हरिमंदिर हिरण्यनगर, उल्कानगरी, औरंगाबाद यांच्यातर्फे आयोजित प.पू. कांती काका शताब्दीनिमित्त ‘मैत्री सुमिरन पर्व’ या महोत्सवाची सोमवारी (ता. दोन) यशस्वी सांगता झाली.
प्रारंभी औरंगाबाद हरी मंदिरचे आधारस्तंभ, मार्गदर्शक प.पू. दीपकभाई जहागीरदार यांनी औरंगाबाद मंडळाचा सुरवातीपासूनचा संपूर्ण इतिहास व प्रगती वर्णन केली. संपूर्ण कार्यक्रम ‘मैत्री’ या विषयाशी निगडित असल्याने आजच्या स्वरूपांनी मैत्री ही नि:स्वार्थी, अपेक्षाविरहित असावी, असे सांगितले. आजची फेसबुक फ्रेंड्स किंवा व्हाॅट्सॲप मैत्री कशी आभासी आहे, हे पटवून दिले.
माहात्म्य दर्शनात प.पू. कांती काका व प.पू. काकाजी महाराज यांच्या मैत्रीचा धागा धरून अमेरिकास्थित प.पू. दिनकर दादांनी या दोन्ही स्वरूपांच्या मैत्रीचे अनेक किस्से विस्तृतपणे खास त्यांच्या शैलीत सांगितले. औरंगाबाद मंडळावर ज्यांची खास कृपादृष्टी आहे, ज्याच्यामुळे आताचे जे विविध मोठे कार्यक्रम येथे पार पडले त्यामागचे प्रेरणास्रोत प.पू. भरतभाई व प.पू. वशीभाई यांची मैत्रीसुद्धा अशीच आहे, असे प.पू. दिनकरभाई म्हणाले. गेली कित्येक वर्षे एकदिलाने, एकविचाराने एका खोलीत राहतात. असेच दुसरे उदाहरण म्हणजे पवई अक्षरधाम येथील प.पू. अश्विन काका व प.पू. हरकचंदभाई.
प.पू. प्रेमस्वरूप स्वामींनीही मित्रता कशी असावी व प.पू. कांती काका व प.पू. काकाजी महाराज यांची मैत्री कशी होती, हे विस्तृतपणे सांगितले.
संत भगवंत प.पू. साहेबजींनी मात्र अतिशय सोप्या भाषेत व स्पष्टपणे सांगितले, की ‘Friendliness is Important dhan friendship.’ त्यांनी याचा अर्थ असा सांगितला की फ्रेंडशिप ही फक्त दोघांमध्ये होत असते व त्याच्या चतु:सीमा त्या दोघांपुरत्याच मर्यादित असतात; परंतु फ्रेंडलीनेस म्हणजे जी व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल त्याच्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण वागणे जरूरी आहे मग ती व्यक्ती कोणत्याही जातिधर्माची, लहान-मोठी अथवा वरिष्ठ-कनिष्ठ असली, तरी त्याच्याशी विनम्रपणे, मित्रत्वाच्या नात्याने वागले पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला होतोच; परंतु त्यामुळे त्याचाही तो क्षण अतिशय समाधानात आणि आनंदात जातो. फ्रेंडलीनेसचा अर्थ खूप विस्तृत आहे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही मित्रतापूर्ण वागले पाहिजे.
शेवटी प.पू.भरतभाईंनी सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य प.पू. कांती काका व प.पू. काकाजी महाराज याच्या मित्रत्वाचे आलेले अनुभव कथन केले.
या कार्यक्रमास शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक हर्षवर्धनजी जैन, मा. महापौर नंदकुमारजी घडोले, गिरजाराम हाळनोर व श्री पीठाधीश्वर श्री महंत १०८ प्रकाशदासजी महाराज, पैठण हे उपस्थित होते. शेवटी सर्व सत्संगी महाप्रसाद घेऊन अत्यंत समाधानाने स्वगृही परतले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील