अंदमान, २५ नोव्हेंबर २०२०: भारतानं आपल्या सर्वात धोकादायक ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या लँड अटॅक आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. अंदमान आणि निकोबार बेटांच्या २४ नोव्हेंबरला म्हणजेच काल सकाळी १० वाजता अज्ञात बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. एका बेटावरून दुसर्या निर्जन बेटावरचं लक्ष्य ह्या क्षेपणास्त्रानं यशस्वीरित्या साधलं. क्षेपणास्त्रानं दिलेल्या वेळेत आपलं लक्ष्य नष्ट केलं.
सोशल मीडियावर भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटने वर (डीआरडीओ) अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल लोक डीआरडीओच्या संरक्षण शास्त्रज्ञांचं कौतुक करत आहेत. गेल्या ८-९ महिन्यांपासून चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात भारतानं अनेक क्षेपणास्त्रं, टॉरपीडो, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेची यशस्वी चाचणी केली. कालच्या चाचणीचा उद्देश क्षेपणास्त्राची श्रेणी वाढविणं हा होता. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची श्रेणी ४०० किमीपर्यंत वाढविण्यात आलीय.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र २८ फूट लांब आहे. त्याचं वजन ३,००० किलो आहे. यात २०० किलोचे पारंपारिक व अण्वस्त्रे बसविली जाऊ शकतात. हे ३०० किमी ते ८०० किमी पर्यंत असलेल्या शत्रूवर निर्विवादपणे हल्ला करू शकतं. त्याचा वेग सर्वात प्राणघातक ठरतो. ते ताशी ४,३०० किमी वेगानं आपल्या लक्ष्यावर धडकतं. ते प्रति सेकंद १.२० किलोमीटर या वेगानं धावण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र दागल्यानंतर शत्रूला याला थांबवण्यासाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही.
नुकतीच एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, वियतनाम भारताचं हे खतरनाक क्षेपणास्त्र खरेदी करू इच्छित आहे. परंतु, हे क्षेपणास्त्र विक्री करण्यासाठी रशियाची परवानगी घेणं भारताला आवश्यक होतं. कारण, ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांच्या एकत्रित प्रयत्नातून बनवण्यात आलं होतं. पण, आता रशियानं देखील ब्रह्मोस ची विक्री करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळं आता लवकरच भारताचं हे अतिशय वेगवान क्षेपणास्त्र व्हिएतनाम मध्ये देखील तैनात होईल. यामुळं दक्षिण चीन समुद्रा मध्ये चीनची चिंता वाढणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे