सुशिक्षित व सुसंस्कृत चोर भाग -२

बेळगावहून आलेला मी अगदी मोकळा गाडीतून उतरलो, उतरल्या उतरल्या सरळ घरचा रस्ता धरला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांबरोबर चालत घरी गेलो. मॉर्निंग वॉक केल्याचे सारखे वाटले त्यावेळी मोबाईल वगैरे काहीच साधन नव्हते, त्यामुळे कितिच्या गाडीत बसलो व आता आलो हे सांगण्याची सोय उरली नव्हती. फक्त लँडलाईन त्यावेळी होता, पण तोही घरातच. घरी गेलो गेट वाजवले तिने दार उघडले पण तिला माझ्या हातात काहीच दिसेना तिचा पहिला प्रश्न.
ती- “आहो तुमची बॅग कुठे आहे तुमची?”
मी -“हरवली”
ती-” कशी काय?”
मी म्हणालो मला अगोदर सकाळची सर्व कामे करू देत मग मी तुला सर्व सांगतो, त्यानंतर मी सर्व आटोपले राम रक्षा म्हणून झाली वज्राबाण झाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची एक जपाची माळ देवासमोर जपली व त्यांना साष्टांग दंडवत घालून बाहेर आलो. ती आंघोळीला कशी हरवली हे सांगितल्याशिवाय जाणारच नव्हती माझे सर्व उरकेपर्यंत ती हॉलमध्ये येऊन बसली होती. कशी काय हरवली बॅग? तुम्ही काय करत होता? बॅग तुमच्याजवळ नव्हती का ठेवायची? वर का ठेवली? तरी मी तुम्हाला सांगत होते की बॅग जवळच ठेवा म्हणून तरी तुम्ही वरती का ठेवली? बस मधली माणसं सगळे चांगले नसतात वगैरे वगैरे तिथे चालू झाले, मी तिच्याकडे बघतच राहिलो मग तिला थोडक्यात सर्व वृत्तान्त सांगितला व नंतर जाऊदे बॅग गेली तर गेली त्यात काय एवढे महत्त्वाचे नव्हते म्हणून मी थांबलो. आहो असं कसं तुमचं लायसन, गाडीचे कागदपत्र होते की आता कसं करायचं? असुदे डुबलीकेट काढू येईल थोडा खर्च असे मी म्हणालो व तीला शांत केले.

बायकांना शांत करणे ही फार अवघड गोष्ट असल्याचे मला त्या वेळी जाणवले. नंतर सौभाग्यवतींनी मला चहा आणून दिला व बाहेर जाऊन या शेजारणीला एकदा त्या शेजारणीला एकदा सांगायला सुरुवात केली आश्चर्य व्यक्त होऊ लागले. एवढे मोठे सर बॅग कशी सांभाळता येत नाही या अर्थाचे लाज असल्यासारखे मला पण मनातल्या मनात लाज वाटायला लागली, पण म्हटलं जाऊद्या एकदा ती वाटून गेलीच आहे व आता काय शिल्लक आहे वाटायला म्हणून तसाच मनाला आवर घालत राहिलो. एव्हाना शाळा भरायची वेळ आली होती, जेवण करून शाळेत आलो संध्याकाळपर्यंत निवांत झालो. या प्रकरणापासून असे वाटले पण पुन्हा विचार आला शाळेत सहकारी मित्रांना पण सांगावे म्हणून त्यांनी सांगितले त्यांनी चार धीराच्या गोष्टी सांगितल्या व मी तो विषय डोक्यातून पार काढून टाकला.

आता गाडीचे डुप्लिकेट पेपर व माझे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी त्याच्या प्रोसेस लागलो, ओळखीचे एक पोलीस होते त्यांना सांगितले तर त्यांनी एक अर्ज करायला सांगितले व त्यामध्ये बॅग इथेच कुठेतरी गाडीवर मागे बांधली होती ती मागच्या मागे पडली आहे व मला डुप्लिकेट कागदपत्रांची आवश्यकता आहे असे सांगितले व हे त्यांनीच सांगितल्यावरून केले त्यांनी अर्ज पोलीस स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे केले व त्यांनी मला या गोष्टीला आठ ते दहा दिवस लागतील असे सांगितले. मी निवांत झालो माझी मुलगी बेळगावच्या के.एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ला ठेवली होती मुलींच्या बाबतीत तिथे जरा सुरक्षा होती म्हणून मी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर मी बेळगावला जात असे तिथे रात्री पर्यंत पोहोचत असे तिथल्या मराठा मित्र मंडळ फार्मसी कॉलेज ला आपली काही मुले होती ती बाहेर खोल्या घेऊन राहत होती, मी त्यांच्याकडे मुक्काम करीत असे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मुली कडे जाऊन दिवसभर थांबून तिला कमी जास्त काही अडचणी असतील तर सर्व निरसन करून संध्याकाळी आम्ही बाहेर जेवत असू व त्यानंतर मी कोल्हापूर साठी गाडी पकडत असे व तिथून रात राणीने पंढरपूरला येत असे. त्यामुळे माझा पाच वर्षे असा बेळगाव प्रवास सुरू होता.

अन्..
एके दिवशी पोस्टमन आला व त्याने तुमचे पाकीट आले आहे म्हणून खाकी लिफाफा माझ्या हाती दिला त्यावर प्रेषक पत्ता नसल्याने कुठून आले ते कळत नव्हते मी ते पाकिट उघडले आणि काय.. मला ते सर्व पाहून आश्चर्याचा धक्काच बसला ज्या चोरांनी माझी बॅग चोरून नेली होती त्यांनी माझे ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स माझे ओळखपत्र, वगैरे सर्व पाठवून दिले होते व त्याच बरोबर सुंदर हस्ताक्षरात एक छोटी चिट्टी पण दिसली त्यात म्हटले होते आम्ही तुमची बॅग उघडून पाहिले तर तुमची महत्त्वाची कागदपत्रे होती ती परत काढायला काय त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही सर्व परत पाठवीत आहे, तुमचे कपडे फक्त आम्ही घेतले आहेत. त्या खाली वर कोणाचे नाव पत्ता न लिहिता फक्त एकदा खाली उजव्या बाजूस “सांगली” असे लिहिले होते मी व माझे कुटुंब हरखून गेलो व नकळतपणे मी म्हणालो “सुशिक्षित व सुसंस्कृत चोर”

नागनाथ राऊत सर
माळशिरस.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा