आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं! स्फोटात नऊ पोलिस ठार, तर अनेकजण जखमी

पाकिस्तान, ६ मार्च २०२३ : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ला झाला आहे. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या हल्ल्यात ९ पोलिस ठार झाले आहेत. सिबी आणि कच्छ सीमेवर हा हल्ला झाला असून, प्राथमिक तपासात हा आत्मघातकी हल्ला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बलुचिस्तानचे पोलिस कर्मचारी आपल्या घरी परतत असताना हा आत्मघातकी हल्ला झाला आहे.

स्फोट एवढा भीषण होता की, पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटी झाले. या स्फोटात ९ पोलिस कर्मचारी जागीच ठार झाले असून, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात पेशावरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १०० हून अधिक पोलिस ठार झाले होते.

पोलिस मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले असताना हा हल्ला घडवून आणण्यात आला होता. पोलिसांच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्याने बॉंबस्फोटाने स्वतःला उडविले होते. फेब्रुवारीमध्ये कराची पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पोलिस मुख्यालयात घुसून केलेल्या या सशस्त्र हल्ल्यात तीन जण ठार, तर १० जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा