औरंगाबाद मधील देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या!

औरंगाबाद, २७ ऑगस्ट २०२२: देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २६ ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाचदरम्यान उघडकीस आलीय.

दरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोट मध्ये, मी खूप साधी आहे. बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते, असं तिनं नोट मध्य लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरती पुढं नोट मध्ये बोलते की माझं स्वप्न टाटा बिर्लांसारखं मोठं होण्याचं आहे. माझ्या मैत्रिणी चांगल्या आहेत. पण माझ बी. कॉम तीन वर्षांचं आहे ते झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. असं देखील तिनं नोट मध्ये लिहिलं आहे. अभ्यासाच्या तणावातून ही आत्महत्या झाली असावी अशी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे.

आरती सर्जेराव कोल्हे वय १९ रा. गुरुपिंप्री, ता. घनसावंगी, जि. जालना असे मृत विद्यार्थिनीचे नाव आणि पत्ता आहे. आरती २५ दिवसांपूर्वीच वसतिगृहात राहायला आली होती. तिचे आई-वडील शेतकरी असून तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने बी. कॉमच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुलींच्या वसतिगृहात ती राहायला आली.

आरती दोन दिवसांपूर्वीच वाळूजमध्ये राहणाऱ्या तिच्या मामांकडे जाऊन शुक्रवारी वसतिगृहात परतली होती. खोलीतील इतर चार मुली लेक्चरला गेल्या मात्र आरती खोलीतच थांबली होती. सकाळी इतर मुली खोलीत आल्या तेव्हा दरवाजा बंद केला होता. त्यांनी जोराचा धक्का देऊन दरवाजा उघडला तेव्हा आरतीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना ही घटना सांगितली. ही घटना कळताच निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरतीला दवाखान्यात दाखल केले. नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरतीला मृत घोषित केले. राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा