पुणे, दि.१० जून २०२०: टीव्हीवर सतत कार्टून आणि चित्रपट पाहायला आईने मनाई केल्याने एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली. त्यामुळे बिबवेवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुलांची मानसिकता कोणत्या दिशेने जाते आहे. या घटनेवरून समोर येत आहे. अशा क्षुल्लक कारणावरून मुले आत्महत्या करत असतील तर, येणाऱ्या पिढीचे भवितव्य अवघड असल्याचे जाणकारांचे मत आहे.
राकेश शिंदे (वय अंदाजे १४, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राकेश हा बिबवेवाडीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसह राहत होता. त्याला कार्टून पाहण्याची आवड होती. मंगळवारी(दि.९) रोजी दुपारी कार्टून पाहण्यावरून आई त्याला रागावली. आणि आईने टीव्ही बंद केला. त्यामुळे रागावलेल्या अल्पवयीन मुलगा वर असलेल्या खोलीत गेला आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बराच वेळ झाला तरी मुलगा परत येत नसल्याचे पाहून आई त्याला पाहण्यासाठी वर गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यानंतर इतर लोकही धावून आले आणि त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेले, परंतू त्या आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक किरण लिटे पुढील तपास करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी