Reasons Behind Increas Suicide Cases: पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात तब्बल २२४ जणांनी आपलं जीवन संपवलं आहे. ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे, जी १७७ इतकी आहे. बदललेली जीवनशैली, करिअरची धावपळ, प्रेमभंग, शिक्षणातील स्पर्धा आणि नोकरी-व्यवसायातील अडचणी यांसारख्या अनेक कारणांमुळे हे प्रमाण वाढताना दिसत आहे. आर्थिक सुबत्तेच्या बदललेल्या कल्पनांमधूनही काहीजण नैराश्याला बळी पडत असल्याचं दिसून येतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या औद्योगिक परिसरात आणि कामगार वस्त्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. याव्यतिरिक्त, काही दुर्दैवी घटनांमध्ये खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळूनही लोकांनी आपलं जीवन संपवलं आहे. सासरच्या छळाला कंटाळलेल्या काही विवाहित महिलांनीही आत्महत्येचा मार्ग निवडला, हे अत्यंत दुःखद आहे.
पोलिसांनी सांगितलं की, अनेकदा विवाहित महिला तक्रार करायला उशीर करतात, ज्यामुळे कारवाईला वेळ लागतो. त्यामुळे जर कोणालाही त्रास होत असेल, तर त्यांनी त्वरित तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
आत्महत्येचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आलेला एकाकीपणा. कुटुंबात असूनही तरुण-तरुणी तणावाखाली एकटे पडतात. त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्यासाठी कोणी पुढे न आल्यास, हा एकटेपणा त्यांना आत्महत्येच्या टोकाला घेऊन जातो. त्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांमध्ये जर कोणी तणावात दिसत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना भावनिक आधार द्या, हे खूप महत्त्वाचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































