सुलेमानी हा भारताविरूद्ध दहशतवादी कटात सहभागी: ट्रम्प

यू एस: अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. अमेरिकेने शक्तिशाली सैन्य जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारले आहे. अमेरिकेने ड्रोनने इराणी जनरलवर हल्ला करून ठार मारले. आता इराणने जनरल सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा अमेरिकेला उघडपणे इशारा दिला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण सोबत युद्ध संपवण्यासाठी सुलेमानी यांना संपवण्यात आले आहे. सुलेमानी भारताविरूद्ध दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

सुलेमानी १९९८ पासून इराणच्या कुडस फोर्सचे नेतृत्व करीत होते. इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) चे हे विशेष युनिट विदेशात छुप्या कारवाई करतात आणि थेट देशातील सर्वोच्च नेते खोमेनी यांना रिपोर्ट करतात. मंगळवारी रात्री बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर शेकडो निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यानंतर वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तीव्र तणाव दरम्यान गुरुवारी रात्री सुलेमानी मारले गेले.