Sunita Williams Grand Welcome at NEMS School: रोजी एन.ई.एम.एस. शाळेच्या प्रांगणात एक अद्भुत सोहळा रंगला. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या २८६ दिवसांच्या अंतराळ यात्रेहून पृथ्वीवर सुरक्षित परतण्याचे जंगी स्वागत करण्यासाठी साईनाथ ट्रस्ट आणि एन.ई.एम.एस. यांनी मिळून एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेतील १५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, आणि वातावरण उत्साहाने भारून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात झाली एका छोट्याशा पण लक्षवेधी नाट्याने. एका चिमुकलीने सुनीता विल्यम्स यांचा वेश परिधान करून अंतराळातील अनुभव जिवंत केले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले. मग सुरु झाला जल्लोष! विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवले, दिवाळीप्रमाणे आतिषबाजी केली आणि फुलांची उधळण करत “वेलकम बॅक… अर्थ मिस्ड यू… सुनीता विल्यम्स” अशा घोषणा दिल्या. वातावरण एकदम उत्साही बनले.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “सुनीता विल्यम्स यांच्याप्रमाणेच तुम्हीही मोठी स्वप्ने पहा. देशाचा झेंडा केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अंतराळातही फडकवता येतो. जिद्द आणि चिकाटी असेल, तर हे नक्कीच साध्य होऊ शकते.” या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
