मेडलचा सुपर संडे, पाच सुवर्ण, बॉक्सिंग-एथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा

5

Commonwealth Games 2022, ८ ऑगस्ट २०२२: २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवलंय. या स्पर्धेच्या नवव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताचं वैभव पाहायला मिळालं. वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन, अमित पंघल आणि नीतू घनघास यांनी सुवर्णपदक जिंकलं. एवढंच नाही तर अॅथलेटिक्स, टेबल टेनिसमध्येही भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. त्यामुळं भारताने ५० पदकांचा आकडा पार केलाय.

बॉक्सिंगमध्ये गोल्ड हॅट्ट्रिक

बॉक्सिंगमध्ये पहिलं नीतू घनघासने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. नीतूने इंग्लंडच्या बॉक्सरचा पराभव केला. या सामन्यात सर्व पंचांनी नीतूच्या बाजूने निकाल दिला आणि सुवर्णपदक भारताच्या नावावर ५-० ने केले. त्यानंतर अमित पंघालने ४८-५१ किलो वजनी गटात फ्लायवेटच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. अमितनंतर निखत जरीनची पाळी आली आणि तिनेही निराश केले नाही. निखतने ४८-५० किलो फ्लायवेटच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा ५-० असा पराभव केला.

एल्डहॉस पॉलने जिंकलं सुवर्ण

मेन्स ट्रिपल जंप मध्ये भारतीय संघाला दुहेरी यश मिळालं. अल्डहॉस पॉलने १७.०३ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकलं. याच स्पर्धेत भारताला रौप्यपदकही मिळालं. अब्दुल्ला अबुबकरने १७.०२ मीटरची सर्वोत्तम उडी मारत रौप्यपदक पटकावलं. अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक पटकावलं. अन्नूने ६० मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात ही कामगिरी केली.

टेबल टेनिसमध्ये देखील कमाल

१० किमी चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक मिळवण्यात यश आलं. संदीपने ३८ मिनिटे ४९.२१ सेकंदाची वेळ नोंदवत पदक जिंकलं. ही संदीपची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. त्याचवेळी, टेबल टेनिसमध्ये अचंत शरथ कमल आणि जी साथियान यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकलं. अंतिम सामन्यात अचांत आणि साथियान यांचा इंग्लंडच्या ड्रिंकहॉल-पिचफोर्ड संघाकडून ३-२ असा पराभव झाला. नंतर अचंत आणि श्रीजा अकुला यांनीही टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकलं.

महिला हॉकी – स्क्वॉशमध्ये कांस्य

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात विजय मिळवला. पूर्ण वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला, पण पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने आश्चर्यकारक कामगिरी केली. कर्णधार सविता पुनियाच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे भारताने शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. महिला हॉकी संघाने तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलंय. दुसरीकडं, स्क्वॉशमध्ये दीपिकापल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन एल. डोना आणि लिलीने कॅमेरूनवर २-० असा विजय मिळवला.

क्रिकेटमध्ये रौप्य पदक

याशिवाय बॅडमिंटन आणि क्रिकेटमध्येही भारताने पदकं जिंकली. बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांतने एकेरी गटात कांस्यपदक जिंकलं तर गायत्री आणि त्रिशा जॉली यांनी महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकलं. भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रौप्यपदक जिंकण्यात यश आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा