ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा करा

इंदापूर, दि. २९ एप्रिल २०२०: ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे तसेच राज्यातील खरीप २०२० हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने दिनांक २०, २१ व २२ या दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. दरम्यान खरीप २०२० हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा वेळेमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे.

मात्र राज्यामध्ये कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टंसींग न पाळले गेल्यामुळे करोना विषाणूंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे जसा शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला, तसा त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय ठेऊन करता येईल का? याबाबत विचार करण्यात आला आहे. कृषि विभागातील अधिकारी / कर्मचान्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम केल्यास कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे शक्य होईल. याकरीता पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी असे तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी दिली.

शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी. नोंदणी करताना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे त्याच गटांकडे नोंदणी होईल असे पाहावे. तसेच त्यानिमित्ताने १०० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.

शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/ गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्या नावासह, त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.

कृषि विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट, पीकनिहाय तयार करुन शेतकऱ्यांना गटाद्वारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांनी समन्वयक म्हणून करावी. निविष्ठांची नोंदणी गटाकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे, खते / किटकनाशके खरेदी करावी. जेणेकरुन सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.

ज्यांना शक्य आहे अशा विक्रेत्यांनी मोबाईल ॲप तयार करुन शेतक-यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे, खते व किटकनाशके शेतकन्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचती करावीत. कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतुकीकरीता कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरता आवश्यक असणारे परवाने कृषि विभागामार्फत गटांकरीता उपलब्ध करून द्यावेत.
मंडळ कृषि अंधिकारी, कृषि पर्वेक्षक किया कृषि सहाष्यक यांचे मार्फत व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवून आणावा, जेणेकरून सदर निविष्ठा खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही.

शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या, निविष्ठा विक्रेत्याकडून निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी. तसेच शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पद्धतीने हाताळण्यात याव्यात. कृषि विभागाच्या अधिका-याने या बाबी हाताळू नयेत.

निविष्ठा पुरवठयाबाबत तालूका स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा व दि.२१ मे २०२० पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे पहावे. सदर कार्यप्रणाली यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यास राज्य स्तरापासून ग्राम स्तरापर्यंत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम सुरु होताना शेतकऱ्यांना सर्व निविष्ठा त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत मिळण्याच्या दृष्टीने वरीलप्रमाणे सुचनांचे पालन करुन राज्यामध्ये सर्व क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरुन कृषि सेवा केंद्रावर एकाच वेळी निविष्ठा खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची गदी होणार नाही आणि करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मदत होईल असे न्युज अनकटशी बोलताना कृषी सहाय्यक प्रशांत मोहोळकर यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा